आघार खुर्द (ता. मालेगाव) येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत मका पिकाची महिला शेतीशाळा तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या शेतीशाळेत मंडळ कृषी अधिकारी रोहिदास आहिरे यांनी मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणा बाबत सविस्तर माहिती दिली तसेच मका पिकात एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रण करण्यासाठी पक्षी थांबेंचे प्रात्यक्षिक करून दाखवून एकरी १० पक्षी थांबे व ५ कामगंध सापळे लावणे तसेच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे बाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सध्याच्या सूक्ष्म व आद्र वातावरणात प्रभावी ठरणाऱ्या जैविक औषधी मेटारायजियम ची फवारणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जर किडीने आर्थिक नुकसानाची पातळी गाठल्यास इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के एस जी ८ ग्रॅम प्रति पंप फवारावे अशी शिफारस केली, माती परीक्षण केल्यानुसार जमीन आरोग्य पत्रिकेनुसारच अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणेबाबत माहिती देऊन माती परीक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सदर शेती शाळेत महिला शेतकरी शितल ठोके यांच्या शेतात मका पिकाचे किडीच्या प्रादूर्भावा बाबत निरीक्षणे घेण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी गितांजली लकारे यांनी या शेतीशाळेचे नियोजन केले. शेतीशाळेतील महिला शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. महाडीबीटी पोर्टल वर लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात आले. सदर शेती शाळेत महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतीशाळेत उपस्थित महिला शेतकऱ्यांचे आभार मानून शेतीशाळा वर्ग संपन्न झाला.