महाराष्ट्र लेखणी मौजे दहिदी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत तालुका कृषि अधिकारी श्री. भगवान गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मका पिकाची महिला शेती शाळा घेण्यात आली.पोक्रा योजनेत तालुक्यातील १४२ गावांचा समावेश करण्यात आलेला असून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका पीक घेतले जाते सद्यस्थितीत पावसातील खंडामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून वेळेत उपायोजना करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेती शाळेचे आयोजन करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्राधान्याने महिला शेतकऱ्यांची शेती शाळा घेऊन महिला शेतकऱ्यांना शेती शाळेत प्रशिक्षित करण्यात येत आहे.दहीदी येथील शेती शाळेत सहाय्यक कृषी अधिकारी वैशाली दराखा यांनी मका पिकावरील लष्करी लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी महिला शेतकऱ्यांना लष्करी अळीच्या जीवनक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन उपाययोजना सुचविल्या. एकरी १० पक्षी थांबे व ५ कामगंध सापळे लावणे तसेच आर्थिक नुकसान पातळी ओळख त्यात १० टक्के अळीचा प्रादुर्भाव असल्यास ५ टक्के निंबोळी अर्क फवारणी किंवा मेटारायझीयम ऍनिसोप्ली ५ ग्रॅम प्रतिलिटर फवारणी करण्याची शिफारस करून कृषी संकुल, काष्टी येथील उपलब्ध असलेल्या मेटारायझियम या जैविक कीटकनाशकाचा लाभ घेणे बाबत माहिती दिली. तसेच मका पिकाला संरक्षित करण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत ३१ जुलैपर्यंत सहभाग नोंदणी बाबत आवाहन करून पिक विमा योजनेची माहिती दिली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी उदय गोसावी यांनी पहिल्या फवारणीनंतर ८ ते १० दिवसांनी इमामेक्टिन बेंजोएट ५ टक्के ८ ग्रॅम प्रति पंप वा थायोमिथाक्झाम १२.६ टक्के, लॅम्बडा सायहेलोथ्रीन ९.५ टक्के ८ मिली प्रति पंप फवारणी करणे बाबत मार्गदर्शन केले.तसेच ॲग्री स्टॅग नोंदणी बाबत माहिती दिली. सदर वेळी होस्ट फार्मर सुरेखा बोरसे यांच्या शेतात मका पिकाचे निरीक्षण नोंदविले. महिला शेती शाळेचे संपूर्ण नियोजन श्रीमती वैशाली दराखा सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले.